औरंगाबाद – खासगी ट्रॅव्हल्स चालकांच्या दुप्पट तिकीट दर आकारणीचा ‘सांजवार्ता ऑनलाईन’ने पर्दाफाश केल्यानंतर परिवहन विभाग आता कारवाई ऐवजी अभ्यास करत आहे. दुप्पट तिकीट आकारुन प्रवाशांची लूट करणाऱ्या ट्रॅव्हल्स चालकांची परिवहन विभागाने चौकशी सुरु केली असून दोषी आढळणाऱ्या ट्रॅव्हल्स चालकांवर लवकरच कारवाईचे आश्वासन प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी दिले आहे.
परिवहन विभागाचा अभ्यास सुरु
दिवाळी सणाच्या निमित्ताने
प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचा गैरफायदा घेत खासगी ट्रॅव्हल्स चालकांनी दुप्पट-तिप्पट
तिकीट आकारुन प्रवाशांची लूट चालवली आहे. यासंदर्भातील वृत्त ‘सांजवार्ता ऑनलाईन’ने प्रसिद्ध केल्यानंतर
परिवहन विभागाला जाग आली आहे. औरंगाबाद ते मुंबई प्रवासासाठी शिवशाही आणि इतर
वातानुकूलित बसचे तिकीट दर ५५० ते ७५० रुपये असताना खासगी ट्रॅव्हल्स चालक २००० ते
२५०० रुपये तिकीट आकारत असल्याचे समोर आले होते. ट्रॅव्हल्स चालकांकडून सुरु
असलेल्या लूटीकडे परिवहन विभागाची होत असलेली डोळेझाक ही त्यांना एक प्रकारे
प्रोत्साहन देणारी ठरत होती. या संदर्भात प्रादेशिक परिवहन विभाग अधिकारी सतीश
सदामते यांच्याशी ‘सांजवार्ता ऑनलाईन’ने संपर्क साधला. सतीश सदामते यांनी सांगितले, की ट्रॅव्हल्स आणि एसटी बस
यांचा मार्ग कोणता असतो, त्यांचे अंतर आणि थांबे किती आहे याचा अभ्यास सुरु आहे.
त्याची माहिती समोर आल्यानंतर संबंधित दोषी ट्रॅव्हल्स चालकांवर कारवाई करण्यात
येईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही ट्रॅव्हल्स चालकांवर कारवाई करण्यात
आली असून त्यांच्या बसेस जप्त करण्यात आल्या आहेत. मात्र ऐनवेळी बस जप्त केल्यामुळे
प्रवाशांचीही तारांबळ होते, तेव्हा दिवाळी सणाच्या काळात जप्तीची कारवाई टाळली
असल्याचे सूत्रांकडून समजले आहे.











